Thursday 19 May 2011

जयंती मधे वाजतात D.J. ..........एक आरोप

जयंतीच्या मिरवणुकीत डिजे वाजविल्या जातो, मोठ मोठ्यानी गाणी वाजविली जातात, पोरं दारु पितात यावरुन बरीच लोकं (मनुवादी) थेट आंबेडकरवादाला मधे गोवतात. डीजे वाजविणे आंबेडकरवादात बसते का? रस्त्यानी नाच गाणे करत मिरवणुक काढणे आंबेडकरवादात बसते का? मिरवणुकीत दारु पिऊन हिंडणे आंबेडकरवादात बसते का? अशा प्रकारचे खवचट प्रश्न विचारुन मनुवादी बौद्ध बांधवांना ब-याचवेळा कोंडीत पकडतात, खच्चीकरण करतात. यावर आमचे साधेभोळे बौद्ध बांधव एक ठरलेलं उत्तर देतात.

तुम्ही जसं गणपतीमधे डीजे, दारु व नाचगाणे करता तसच आम्ही जयंतीला करतो 

मुळात माणुस हा उत्सवप्रिय प्राणी आहे. आनंद साजरा करण्याच्या हल्ली ब-याच सोयी उपलब्ध आहेत. अगदी वाढदिवसाचा आनंद घरात केक कापुन साजरा करण्यापासुन ते भारत क्रिकेटची मॅच जिंकतो तेंव्हा रात्रभर रस्त्यानी टवाळक्या करत घोषणा देत हिंडणारे क्रिकेटप्रेमी हे सगळं आनंद व्यक्त करण्याच्या विविध त-हामधे मोडतं. याचीच मोठी आवृत्ती म्हणजे उत्सव होय. भारतात रोज कित्येक प्रकारचे उत्सव साजरे होत असतात. विविध जाती, धर्म, पंथ, वयोगट किंवा ध्येय पातळीवर रोज वेगवेगळे उत्सव पाहायला मिळतात. आयटी कंपनीतील टीम प्रोजेक्ट डिलिव्हर्ड झाल्यावर एखाद्या होटेलात पार्टीच्या नावाखाली उत्सव साजरा करते. सात आठ महिने रोज १५-१५ तास राबुन थकलेले चेहरे येथे जल्लोष करतात. सीमेवरील जवान एखादी मोहीम फत्ते केल्यावर उत्सव साजरा करते. सणा सुधीच्या नावाखाली गणश चतुर्थी, शारदा, दुर्गा ते अगदी काळूबाईची जत्रा पर्यंतचे वेगवेगळे धार्मिक उत्सव जिकडे तिकडे साजरे होताना दिसतात. जो माणुस गणेश उत्सवात सहभागी होतो त्याला गणपती बद्दल नितांत श्रद्धा असेलच असे नाही. तरी तो तिथे जातो, कारण जरी मनात भक्ती नसली तरी मानवाला उत्सव आवडतो. किंवा याच्या अगदी उलट गणेश उत्सवात डीजे लावुन नाचणे म्हणजे मनात भक्ती नाही असेही नाही. भक्ती वेगळा भाग आहे व उत्सवातील जल्लोषात झोकुन देणे वेगळा. दोघाचा परस्पर संबध जोडुन उत्सवाच्या मोजपट्टीने भक्तीला मोजता येणे नाही, किंवा भक्तानी उत्सवात झोकुन देऊ नये असेही नाही. उत्सव प्रियता हा माणसाचा स्थाय़ीभाव आहे. संबंधीत उत्सवात सामिल होणा-याला उत्सवाची ऐतिहासीक वा धार्मिक मोजपट्टी लावणे सरासर चुक आहे.  उत्सवाच्या कारणापेक्षा उत्सवाचं फलित माणसाला आकृष्ट करतं.

उत्सव कसे साजरे होतात. 

जगाच्या पाठीवर कुठेही जा, मणुष्यप्राणी उत्सव साजरा करताना दिसतो. अगदीच गरीबातील गरीब देश असो व गर्भश्रीमंत, उत्सव आलाच. उत्सवात माणसाच्या त्या त्या प्रांतातील संस्कृतीचा, समाजाचा व एकंदरीत चालिरीतींचा प्रतिबींब बघायला मिळतो. नाच-गाणे, खाणे-पीणे हे जगातल्या बहुसंख्य उत्सवातील अगदी बेसीक घटक आहेत. एखाद्या उत्सवात नाचणा-या समुहाला बघुन त्याच्या धर्माचं मुल्यांकन कुठेच केलं जात नाही. किंवा धर्म हे उत्सवाचं प्रतिबींब असतो असेही नाही. उत्सव हा केवळ आनंद व्यक्त करण्यासाठी एखादया गटाने एकत्रीत येऊन साजरा केलेला जल्लोष होय. हा जल्लोषे जगाच्या पाठीवर सगळेच वेळोवेळी करत असतात. एखादया ख्रिश्चनाला नाच गाणं करताना बघुन तुम्हाला येशूनी हेच शिकवलं का? असं कुणीच विचारणार नाही. किंवा हिंदुना गणपती उत्सवात टांगा पल्टी होऊन नाचताना वा दांडीया व गर्भा करताना कित्येक तरूण-तरुणीने केलेल्या अश्लिल चाळ्याना बघुन कुणीच धर्माची कसोटी लावत नाही. गर्भारासच्या ठिकानी तर दारु पासुन कोंडोम पर्यंतची सगळी सोय असते. हे उत्सवाचं झालेलं विकृतीकरण होय. या उत्सवाच्या मोजपट्टीनी मोजायचं म्हटल्यास हिंदु धर्म सगळ्यात अश्लील व हीन पातळीचा ठरेल जेंव्हा की हे सत्य नाही. या धर्मानी सदैव शक्य तितकी नितीमत्ता पाळली आहे तरी उत्सवानी वाकडं पाऊल टाकलं असं प्रथम दर्शनी दिसतं. पण मुळात उत्सवाच्या मोजपट्टीनी धर्माला मोजुच नये.
 
जयंती एक अवस्था होय अन धर्म एक संस्कार.  

उत्सव ही बेधुंद होण्याची अवस्था आहे, अन धर्म हा चिरकाल टिकणारा संस्कार आहे.  एका आवस्थेला धरुन संस्काराचं मुल्यमापन होऊच शकत नाही. जयंतीत बेधुंद नाचणारे तरूण नक्कीच दिसतील पण तो आंबेडकरवाद नसुन आंबेडकरवाद्यांनी उत्सवात गाठलेली एक अवस्था आहे. या अवस्था चिरकाल नसतात त्या उत्सवापुर्ती मर्यादीत असतात. पण उत्सवापलीकडे या माणसाच्या सोबत जो चालतो तो आहे संस्कार. हा संस्कार असतो बौद्ध धर्माचा अन आंबेडकरवादाचा, तो एका अवस्थेनी गारद व्हावा ईतका दुबळा वा कुचकामी नसतो. त्याची व्याप्ती प्रचंड आहे.

जयंतीची मिरवणुक सुध्दा उत्सवाचाच भाग आहे. जयंतीचं कारण आंबेडकरवाद आहे, जयंती साजरी करणारे आंबेडकरवादी असतात पण जेंव्हा हिच जयंती उत्सवाचं रुप घेते तेंव्हा याला फक्त उत्सव म्हणुन बघावं. कारण उत्सवाचा स्थायीभाव हा आहे की त्याला व्याकरण लागु पडत नाही. उत्सवात आपल्या आवडत्या मार्गाने बेधुंद होऊन आनंदाची उत्कटता गाठायची असते. उत्सवाचा प्रवासच मिळणा-या परिणामांच्या दिशेनी असतो, उत्सवाच्या कारणाच्या दिशेनी नाही.

D.J. म्हणजे आंबेडकरवाद नव्हे, तर उत्सवाचा आनंद वाढविणारा एक घटक आहे. तसेच जयंती म्हणजे आंबेडकरवाद नसुन आंबेडकरवादयानी साजरा केलेला उत्सव होय. उत्सवाला आंबेडकरवाद म्हणने मुळातच खुजेपणा होय. आंबेडकरवाद फार व्यापकं आहे. पण अगदीच एका वाक्यात म्हणायचं झाल्यास, समतेचा पुरस्कर्ता म्हणजे आंबेडकरवादी. बाबासाहेबानी उभं आयुष्य जाळलं ते समतेसाठी, किंबहुन बौद्ध धर्माच्या वाटेनी जाण्यासं सांगण्याचं कारणही तेच आहे. त्यांचं अंतीम ध्येय हेच होतं की या समाजात समता व बंधुत्व यावं. या दोन गोष्टी साध्य झाल्यास अर्ध्या अडचणी निकाली निघतील.

म्हणुन मित्रानो बेधडकपणे जयंती साजरी करा.... अन DJ ही वाजवा.

 Madhukar Ramteke


आभार
प्रशांत म. गायकवाड

No comments: