Sunday 22 May 2011

ड्रॅगन पॅलेस टेम्पल...अप्रतिम वास्तूकलेचा आनंद...!!!

लोकसत्ता , २६ एप्रिल २००९

धार्मिक आणि पर्यटनाच्या जागतिक नकाशावर नागपूर शहराचे नाव कोरणारे कामठीतील ‘ड्रॅगन पॅलेस टेम्पल’ विदर्भाच्या मुकुटातील लखलखता हिरा आहे.

‘हॉटस्पॉट’च्या संकल्पनेत चपखल बसणारी ही वास्तू अप्रतिम वास्तूकलेचा नमुना म्हणून विख्यात झाली आहे. नागपूर-जबलपूर मार्गावर नागपूरपासून अवघ्या पाऊण तासाच्या अंतरावर असलेल्या ड्रॅगन टेम्पलची उभारणी दहा वर्षांपूर्वी करण्यात आली. २३ नोव्हेंबर १९९९ या दिवशी ड्रॅगन पॅलेस टेम्पल पर्यटकांसाठी खुले झाले. भगवान गौतम बुद्धांच्या बौध्द धर्माला वाहिलेली शानदार वास्तू आता फक्त बौद्ध धर्मीयांपुरती मर्यादित राहिलेली नाही. सर्वच जाती-धर्माचे लोक या वास्तूची रचना अनुभवण्यासाठी येथे आवर्जून भेट देतात.. आणि हेच ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या उभारणीचे यश आहे. ही सुंदर वास्तू पाहण्यासाठी गेल्या दहा वर्षांत विविध धर्माच्या ५० लाख पर्यटकांनी भेट दिलेली असून वार्षिक सरासरी ५ लाख पर्यटक येणारे विदर्भातील हे एकमेव स्थळ. ‘आर्किटेक्टरल मास्टरपीस’ याच शब्दात ड्रॅगन पॅलेस टेम्पलचे वर्णन करता येईल.
माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांचे १९९४ साली बीडी कामगारांच्या हक्कासाठी आंदोलन सुरू असताना टोकियोतील मदर नारिको ओगावा सोसायटीच्या नारिका ओगावा यांची कामठीत योगायोगाने भेट झाल्यानंतर ड्रॅगन पॅलेस टेम्पल उभारणीच्या प्रस्तावाला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरुप आले. मात्र, या वास्तूला नेमके काय नाव द्यावे, यावर प्रचंड खल झाला. जवळजवळ दीडशे नावे नजरेखालून घातल्यानंतर ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे नाव निश्चित करण्यात आले. २६ महिन्यांमध्ये ५ कोटी रुपये खर्चून ड्रॅगन पॅलेस टेम्पलचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. दहा एकर जमिनीवर उभारलेली ही वास्तू नागपूरचे प्रख्यात इंजिनियर दिवं. पी.टी. मसे आणि आर्किटेक्ट आर.एम. गोडसे यांनी संयुक्तपणे डिझाईन केली होती. बौद्ध परंपरेतील सवरेत्कृष्ट प्रार्थना मंदिराच्या संकल्पनेला डोळ्यापुढे ठेवून त्यांनी याचा कच्चा आराखडा तयार केला. लोटस टेम्पल म्हणूनही याची ओळख जगभर आहे. विस्तीर्ण परिसरातील हिरवळ, सुंदर पुष्पांनी बहरलेली झाडे, आणि आकर्षक लँडस्केपिंगमुळे ही वास्तू भुरळ घालते. फुलझाडांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली असून वास्तूरचनेच्या सौदर्यात त्यामुळे भर पडली आहे. देखणे कंपाऊंड आणि संगमरवरी पथ पाहून मन थक्क होते. संगमरवरी पायऱ्या चढून ध्यान केंद्रात शिरल्यावर गौतम बुद्धांचा चंदनाचा दहा फूट उंचीचा पुतळा लक्ष वेधून घेतो. हे ध्यान केंद्र बौद्ध धर्मीयांचे पवित्र पूजास्थळ आहे. या परिसरात सुंदर ऑडिटोरियम आणि ग्रंथालयही असल्याने बौद्ध धर्माच्या अभ्यासकांना भेट देण्यासाठी ही अत्यंत योग्य जागा आहे. ऑडिटोरियमचा एक सेक्शन बौद्ध धर्माच्या भूतकाळातील सोनेरी दिवसांच्या आठवणी ताज्या करतो. आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘बेस्ट कॉक्रिंट स्ट्रक्चर’ हा पुरस्कार ड्रॅगन पॅलेस टेम्पलने पटकावलेला आहे. हा नागपूर शहराचा मोठा सन्मान आहे. पर्यटनाच्या व्याख्येत धर्म-जात-पातीला स्थान नाही. एक सुंदर वास्तूरचना पाहण्याचा आनंद लुटण्यासाठी काही तास ड्रॅगन पॅलेस टेम्पलला देण्यास मुळीच हरकत नाही. तुम्ही सहकुटुंब वर्षभरात केव्हाही या हॉटस्पॉटला भेट देऊ शकता. जाण्याचा मार्ग अत्यंत सोपा आहे. स्वत:चे वाहन असेल तर ठीकच, जर नसेल तर शहर बसेससुद्धा कामठीपर्यंत रोज जातात. जागतिक शांतता, सौहार्द आणि मैत्रीचा संदेश देणारे ड्रॅगन पॅलेस टेम्पल पर्यटकांना हाक देत आहे..!







आभार
प्रशांत म. गायकवाड

No comments: