Monday 16 May 2011

आंबेडकर आणि जातीयवादी आडनावे!

(लक्ष्मण वाघ/पुणे)-
आडनाव ही संस्था उदबोधक अदभूत आणि संस्मरणीय आहे. प्रचलित समयी आपल्या वर्तमान नाव किवा आडनावावरून ती व्यक्ती समाजामध्ये ओळखली जाते. आडनावामुळे आपण जीवनाच्या सातत्याचा अविभाज्य घटक आहोत, याचे प्रत्यंतर येते. भारतात आणि महाराष्ट्रामध्ये व्यक्तीला स्वत:ची ओळख सिद्ध करण्यासाठी प्रथम नाव आणि आडनावाची अत्यंत आवश्यकता असते. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे स्वरूप व्यापक करण्यासाठी नाव आणि आडनाव वापरले जाते. आडनावातून व्यक्तीचा आविष्कार प्रकट होतो. दोन व्यक्ती किवा कुटुंबीयांमध्ये आडनावांचे साधर्म्य असेल तर त्यांच्यामध्ये त्वरित ऋणानुबंध प्रस्थापित होतो; एवढे सामर्थ्य आडनावामध्ये समाविष्ट आहे.
समाजामध्ये एकाच नावाच्या अनेक व्यक्ती वावरत असतात. त्या व्यक्तींचा निर्देश अधिक निश्चितपणे करता यावा म्हणून आडनावांची उत्पत्ती फार वर्षांपूर्वी झाली असावी, असे आडनावांचे वर्णन ज्ञानकोषकार डॉ. श्रीधर केतकर यांच्या 'महाराष्ट्रीय आडनावांची उपयुक्तता' या ज्ञानकोशात वाचावयास मिळते. याशिवाय पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या भारतीय संस्कृती कोशात अनेक आडनावांची माहिती उपलब्ध आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबावडे या गावी सकपाळ घराण्यामध्ये १४ एप्रिल, १८९१ रोजी एका बालकाचा जन्म अस्पृश्य कुटुंबात झाला. मुलाच्या शिक्षणासाठी रामजी सकपाळ यांनी महू येथून सातारा येथे स्थलांतर केले. रामजी यांनी भीमराव यांना सातारा येथील प्राथमिक शाळेत भीमराव रामजी सकपाळ या नावाने दाखल केले. जातीयवादाचे आणि गरिबीचे चटके सहन करीत भीमराव शाळेतील ओसरीवर बसून शिक्षण घेत होते. भीमराव शिकत असलेल्या वर्गामध्ये आंबेडकर नावाचे पुरोगामी विचार असलेले ब्राम्हण शाळामास्तर होते. भीमराव बालपणापासून हुशार आणि तल्लख बुद्धीचे होते. आंबेडकर मास्तर भीमरावाच्या अभ्यासावर लक्ष देत असत आणि त्यांच्यावर त्याचे खूप प्रेम होते. भीमराव सकपाळ या बुद्धिमान विद्यार्थ्याला संकपाळ या नावाने संबोधणे आंबेडकर मास्तरांना संकोचल्यासारखे वाटत होते. म्हणून त्यांनी रामजी यांची संमती घेऊन स्वत:चे आडनाव भीमरावला प्रदान केले. तेव्हापासून भीमराव रामजी आंबेडकर या नावाने ते सर्वांना परिचित झाले. प्रखर बुद्धिमत्ता आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची जिद्द यामुळे डॉ. आंबेडकर अस्पृश्य समाजाचे नेते म्हणून सर्वांना ज्ञात झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाच्या जागृतीसाठी विदर्भ, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र वगैरे ठिकाणी अनेक दौरे केले. प्रस्तुत विभागामध्ये दौरे करताना एक गोष्ट त्यांच्या प्रकर्षाने निदर्शनास आली की, अनेक अस्पृश्य समाजातील व्यक्तींची आडनावे जातीवाचक स्वरूपाची आहेत. उदाहरणार्थ दगडू धोंडिबा महार, पिराजी भैरू मांग, कचरू चिमाजी चांभार अशा स्वरूपाची जातीवाचक आडनावे असलेल्या व्यक्तींची नावे श्रवण करताना ते दु:खी, व्यथित आणि अस्वस्थ होत असत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजजागृतीच्या संबंधाने नागपूर येथे २/४/१९३४ रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. आंबेडकर म्हणाले, मनू हा अत्यंत निष्कृष्ट आणि हीन वृत्तीने ग्रासलेला पुरुष होता. त्याने माणसामध्ये विषमतेच्या, जातीभेदाच्या आणि वर्णव्यवस्थेच्या भिती निर्माण केल्याच; तथापि उच्चवर्णीय ब्राम्हण समाज आणि बहुजन समाजामध्ये आडनावांचे वर्गीकरणसुद्धा मोठ्या चाणाक्षपणे केले आहे. सन्माननीय आणि प्रतिष्ठित स्वरूपाची अनेक आडनावे ब्राम्हण समाजामध्येच निदर्शनास येतात. आडनावामुळेच प्रस्थापित समाजव्यवस्थेतील जातीयतेचे ओंगळ, हिडीस दर्शन प्रकर्षाने प्रत्ययास येते. अस्पृश्य समाजामध्ये ज्या व्यक्तींना आडनावे नाहीत किवा ज्यांची आडनावे जातीयवादी स्वरूपाची आहेत, त्यांनी स्वत:ची आडनावे बदलावीत आणि ब्राम्हण समाजामध्ये सन्माननीय आणि प्रतिष्ठित संबोधिली जाणारी आडनावे धारण करावित.
डॉ. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनपर भाषणामुळे विदर्भातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूर्वाश्रमीच्या महार मंडळींनी आपल्या आडनावांमध्ये परिवर्तन केले आहे. ब्राम्हण समाजामध्ये सन्माननीय असलेली पटवर्धन, वैशंपायन, गोडबोले, गोखले, टिळक, अभ्यंकर, साने, परांजपे वगैरे स्वरूपाची प्रतिष्ठित आडनावे अस्पृश्य मंडळींनी धारण केल्यामुळे त्यांची प्रतिष्ठा आणि अस्मिता वृद्धिगंत झाली असून जातीवाचक आडनावांमुळे हीनत्वाची आणि न्यूनगंडाची भावना संपुष्टात आली आहे.

No comments: