Thursday 19 May 2011

व्यक्तिवेध : डॉ भीमराव गस्ती..!!
लोकसत्ता
बुधवार, २३ जून २०१० 

‘आपल्या शब्दात विलक्षण ताकद आहे, बेरड आणि देवदासींच्या प्रश्नांकडे पाहणारी आपली दृष्टी हरणाच्या पाडसासारखी निर्मळ, चित्त्यासारखी थेट, निडर आहे, आपण प्रवृत्तीवर प्रहार करता, पण त्या बाळगणाऱ्यांशी आपले नाते आत्मीयतेचे असते’, ही प्रतिक्रिया आहे ज्येष्ठ लेखक-नाटककार विजय तेंडुलकर यांची आणि ती आहे भीमराव गस्तींसंदर्भात. या प्रतिक्रियेची आठवण झाली, ती गस्तींच्या षष्टय़ब्दीपूर्तीनिमित्ताने. गस्तींचा जन्म बेरड समाजातला. गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या आणि क्षुल्लक गुन्ह्यासाठी पोलिसांचा अमानुष मार खावा लागणारा हा समाज. त्यांच्या १४ नातेवाईकांना पोलिसांच्या निर्घृण मारहाणीत जीव गमवावा लागला होता. अत्यंत विपरीत परिस्थितीत गस्तींचं शिक्षण झालं. शिक्षणाची परंपरा नव्हती, पण वडिलांनी शिक्षण द्यायचं ठरवलं आणि गस्तींनी त्या संधीचं सोनं केलं. शाळेत आणि समाजातही अस्पृश्यता इतकी पराकोटीची की शाळेच्या वाटेवर विहिरीपाशी कुणीतरी केलेली विष्ठा मास्तरांच्या सांगण्यावरून गस्तींना स्वत:च्या हाताने उचलावी लागली आणि घाण झालेल्या हातांवर कुणी पाणीही घालावयास तयार न झाल्याने, मातीत हात घुसळून त्याच हाताने शाळेत जाऊन दिवसभराचा अभ्यासही करावा लागला!

गस्तींनी त्याबद्दल सूडभावना मात्र बाळगली नाही. शिष्यवृत्ती होती, त्यामुळे गस्तींचं शिक्षण सुरू होतं. गस्ती अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण झाले, पदव्युत्तर पदवीही त्यांनी मिळवली. रशियात जाऊन संशोधन करीत पीएच.डी. झाल्यावर वैद्यकीय-औद्योगिक संशोधन संस्थेत भूभौतिक संशोधन केंद्रात संशोधक म्हणून नोकरीही मिळाली. पण आणीबाणीत अटक झाली आणि नोकरी गेली.

पुन्हा नोकरी करायची नाही, असा निश्चय करूनच गस्ती तुरुंगाबाहेर पडले आणि त्यांनी बेरड तसेच देवदासी समाजाच्या उन्नतीसाठी स्वत:ला वाहून घेतलं. घरात देवदासी बनलेली बहीण आणि मेहुणी होती. त्यांच्या नशिबाचा फेरा गस्तींना अस्वस्थ करीत होता. देवदासी प्रथा बंद व्हावी म्हणून आंदोलनाच्या, सत्याग्रहाच्या मार्गाने न जाता गस्तींनी त्या देवदासींना सक्षम बनवण्याचा उपक्रम हाती घेतला. गस्तींनी त्यांच्या मुलींना शिक्षण दिलं. विजापूर, बागलकोट, रायचूर, बेल्लारी, गुलबर्गा जिल्ह्यातील दोनेकशे मुली शिकल्या. मॅट्रिक झाल्या. पुढे शिकणं शक्य नसलेल्यांना त्यांनी शिवणकाम शिकवलं, कामही मिळवून दिलं. त्यातलीच एक मुलम्मा तहसीलदार बनली. पोटापाण्यासाठी पुण्या-मुंबईला पळून जाणाऱ्या देवदासींना वाचवा, अशी हाकाटी करीत आलेल्या तरुणांनाच गस्तींनी त्यांच्याशी विवाह करायला तयार केलं. तीस हजार देवदासींना गस्तींच्याच प्रयत्नातून पेन्शन मिळालं, घरकुलासाठी मदत, शेळ्यामेंढय़ांसाठी कर्ज मिळालं. त्यांची आरोग्य शिबिरं झाली, उपचार व्यवस्था झाली. बेरड, रामोशी समाजाच्या डोक्यावरचा गुन्हेगारीचा शिक्का जावा यासाठी गस्तींनी प्रयत्न केले आणि त्यांची कर्नाटकच्या अनुसूचित जमातीत नोंद करून घेतली.

‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’, हा डॉ. आंबेडकरांचा मंत्र गस्तींनी शब्दश: आचरणात आणला.

गस्तींचं व्यक्तिमत्त्व अनाकर्षक तसंच त्यांचं वक्तृत्वही सामान्य; पण लेखणी प्रभावी! त्यांनी ‘बेरड’ हे आत्मचरित्र लिहिलं, ‘आक्रोश’, ‘रानवारा’, ‘कौरव’ ही त्यांची अन्य पुस्तकंही गाजली. त्यांनी विक्रीचे उच्चांक गाठले, पुरस्कार मिळवले. गस्तींचं लेखन पाठय़पुस्तकात समाविष्ट झालं. स्वत:साठी जगणारे अनेक असतात, गस्ती समाजासाठी जगले. अवहेलनेत आयुष्य घालवाव्या लागणाऱ्या समाजाच्या मनात गस्तींनी अग्नी चेतवला. त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न अनेकांनी केला, पण ते कुणाच्याही जाळ्यात अडकले नाहीत. ‘मी सर्वाचा आहे, पुरागामित्वाच्या बुरख्याआड जातीय डबकी नकोत,’ ही भूमिका त्यांनी जीवनभर जपली. गस्तींना आता ध्यास आहे तो बेरड-रामोशी समाजाची नोंद महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींत व्हावी यासाठीचा. बेरड आणि रामोशी जात्याच निडर, त्यांचा योग्य उपयोग स्वतंत्र पलटण उभारून भारतीय लष्करानं करून घ्यावा यासाठी आता गस्ती धडपडताहेत.

त्यांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा.

जय भीम 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
आभार
प्रशांत म. गायकवाड