Sunday 22 May 2011

जागतिक नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर....!!!!

आनंद म्हस्के


``छाती ठोकून सांगु जगाला।
 असा विद्वान होणार नाही।।
जर झाला विद्वावान मोठा।
 जसा बुद्ध भगवान होणार नाही।।''

गायक प्रभाकर पोखरीकरांचे हे गाणे! भावी पिढीला डॉ. बाबासाहेब व तथागत बुद्ध समजावून घेणे फार महत्त्वाचे आहेत. हे जगातील महान क्रांतीकारक जागतिक नेते आहेत. खरा लिडर तो असतो, जो आनंदाने जबाबदारी स्वीकारून कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवतो. लिडरशीप हा कोणता दर्जा नाही. ती एक मानसिक जडणघडण आहे.

लिडरशिपसाठी जिद्द, स्वाभिमान , निर्भिडपणा, दूरदृष्टी हवी आणि महत्त्वाचे म्हणजे त्याचा पिंड हा समाजसुधारकाचा हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी `रानडे गांधी ऍण्ड जिना' या ग्रंथात महान नेता कोणास म्हणावे यावर सुंदर विवेचन केलेले आहे. कार्लाईल या सुप्रसिद्ध विचारवंतांच्या मते थोर व्यक्तीकडे प्रामाणिकपणा हा उपजत असावा लागतो. तो स्वतची आत्मस्तुती करीत नाही. तसा त्याला अहंकारही नसतो. प्रामाणिकपणा शिवाय तो जगूच शकत नाही.

लॉर्ड रोझबेरी नेपोलियनच्या श्रेष्ठत्वाची चर्चा करताना म्हणतो, `नैतिक गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता यांचा समुच्चय म्हणजे थोर व्यक्ती होय. काही तत्त्वज्ञानी म्हणतात की, समाजातील साफसफाई करण्यासाठीच थोर व्यक्ती जन्मास येतात. त्यांच्यामध्ये सर्वसमान्य माणसांपेक्षा अलौकिक शक्ती असते. डॉ. बाबासाहेबांच्या मते यापैकी कोणतीही कसोटी पूर्णत्वाने बरोबर नसून अर्धसत्य आहे. डॉ. बाबासाहेब म्हणतात की, थोर व्यक्तीच्या अंगी प्रामाणिकपणा हवा; कारण ते नैतिक अधिष्ठान आहे. तसेच तो सत्याच्या जवळ न्यायमार्गाने जाणारा गुण आहे. परंतु नुसता प्रामाणिकपणा पुरेसा नाही. कारण व्यक्ती ही प्रामाणिक आहे पण मुर्ख आणि सुमार बुद्धीची असेल तर? बुद्धीच्या आधारे थोर व्यक्ती संकटातून मार्ग करू शकते. तरीही प्रामाणिकपणा व बुद्धिमत्ता ही व्याख्या डॉ. बाबासाहेबांना अपुरी वाटते. त्यासाठी (एमिनंट इंडिव्हिज्युअल) म्हणजेच थोर व्यक्ती ही समाजधारणेच्या हेतूने प्रेरित झाली पाहिजे. थोर व्यक्तीने सर्व प्रकारच्या मानवी अहिताच्या भावनांतून समाजाला स्वच्छ करुन असते.

तथागत बुद्ध, कबीर, महात्मा फुले आणि गाडगेबाबा यांनी समाजाची मने आणि भावना स्वच्छ करण्याचे कार्य केले म्हणून डॉ. बाबासाहेबांनी त्यांना आपले गुरू आणि आदर्श मानले. जातीवर्ण व्यवस्थेच्या व अस्पृश्यांच्या प्रश्नावर संघर्ष करताना डॉ. बाबासाहेबांनी गांधी, टिळक, विठ्ठलराव शिंदे यांच्या थोरपणाचा बुरखा फाडून त्यांना ढोंगी म्हटले. कारण त्यांच्या आचार, विचार, उच्चार आणि कृतीमध्ये अस्पृश्यता निवारण्याचा प्रामाणिकपणा नव्हता. भारत हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळविणार! अशी घोषणा करणारे टिळक अस्पृश्य जातीत जन्मास आले असते तर भारत हा माझा जन्मसिद्ध अधिकार आणि अस्पृश्यतेचे उच्चाटन करणे माझे आद्यकर्तव्य आहे, अशी टिळकांनी घोषणा केली असती.

अस्पृश्यांचे आपणच कैवारी असल्याचा गांधीजी गोलमेज परिषदमध्ये टाहो फोडीत होते. त्यांना डॉ. बाबासाहेबांनी स्पष्ट शब्दांत सुनावले,`` मि. गांधी आपण अस्पृश्यांचे दायी असाल पण मी त्यांची माई आहे.'' गांधी टिळक कितीही मोठे व लोकप्रिय नेते असले तरी डॉ. बाबासाहेबांनी त्यांचे पितळ उघडे पाडले. पुण्याचे गोखले स्मारक सभागृहात न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या विचारांची सर्वोत्कृष्ट चिकित्सा करून त्यांच्या विचारांचे मोठेपण जगासमोर आणून रानडे यांना महान नेत्यांच्या पंगतीला बसविले. 

आधी राजकारण की आधी समाजकारण यामध्ये न्या. रानडे आधी समाजकारण म्हणत होते. परंतु टिळक, चिपळुणकर याला नुसता विरोधच करीत नव्हते तर न्या. रानडे यांच्या समाजसुधारणा कार्यात अडथळे निर्माण करीत होते. याच कसोटीवर डॉ. बाबासाहेबांनी न्या. रानडेंमध्ये महान  नेता शोधावा, ही मोठी बाब आहे. लोकक्षोभाची तमा न बाळगता डॉ. बाबासाहेब महात्मापेक्षा देश मोठा मानत होते. मी मूर्तीपुजक नसून मुर्तीभंजक आहे आणि टिळक, गांधी, जीना यांचे मूर्तीभजन मी एवढ्यासाठी करतो की, बॅ. गांधी व बॅ. जीना यांनी भारतीय राजकारणात फार गेंधळ करून ठेवला आहे. एक दिवस तर माझे देशबांधव समजतील की देशापेक्षा कोणी मोठा नाही. व्यक्तीपूजा नि देशप्रेम या भिन्न गोष्टी असून परस्परविरोधी सुद्धा असतील.

``खुद को कर बुलंद इतना,
 की हर तकदीरसे पहले
खुदा बंदे को पुछे,
बता तेरी रजा क्या है?''

याचा अर्थच असा आहे की, स्वतचा आत्मविश्वास तू इतका प्रबळ कर की तुझ्या भवितव्याचे प्रत्येक अक्षर हे तुझ्या इच्छेप्रमाणेच नियतीनं कोरलं पाहिजे. जर नियती व दैव नावाची गोष्ट असेल असं कुणाला वाटत असेल तरी माझा आत्मविश्वास आणि माझं कर्तृत्व हेच या देशामध्ये अंतिम ध्येय असलं पाहिजे. याचं मूर्तीमंत उदा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. आपल्या भाषणात जगातील महान विचारवंतांचे महान विचारवंतांचे महान विचार मांडणारे डॉ. बाबासाहेबांच्या प्रत्येक शब्दाला तलवारीसारखी धार असल्याने ज्यांना भीमटोला बसे त्यांना तो आंबेडकरी आवेश आणि झपाटा हा मूर्तीमंत तोफखाना वाटत असे.

इंग्लिश लेखक थॉम्पसन म्हणतो की,`डॉ. आंबेडकरांचे जे जे साहित्य दृष्टीस पडेल ते ते वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की डॉ. आंबेडकरांमुळे सनातनी प्रवृत्तींना वेडाचे झटके येतात.' `बोले तैसा चाले तयाचि वंदावि पाऊले'.

डॉ. बाबासाहेबांनी उक्तीप्रमाणे कृती केली. माझ्या अस्पृश्य समाजाची गुलामगिरीतून मुक्तता करण्यात अपयशी ठरलो तर स्वतला गोळी घालून घेईन, अशी प्रतिज्ञा केलेल्या डॉ. बाबासाहेबांनी शिवराय व शंभुराजे यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आपल्या आंदोलनाची सुरूवात रायगड पायथा महाड येथे चवदार तळ्याचे आंदोलन करून पाण्याला आग लावली. त्या ज्वालामुखीतून 25 डिसेंबर, 1927 रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करून विषमतेचा इतिहास मोडला. 13 ऑक्टोबर, 1935 रोजी येवला येथे धर्मात्तरांची घोषणा करून मानवतेच्या समतेचा इतिहास मांडला आणि 14 ऑक्टोबर, 1956 रोजी नागपूर येथे धर्मांतर करून मानवतेचा नवा इतिहास घडविला. 

1920 ते 1956 केवळ 26 वर्षांत स्वतचे आंबेडकरी युग निर्माण करणारे डॉ. बाबासाहेब हे जागतिक नेते आहेत. महान अर्थतज्ञ असल्याचे `प्राब्लेम ऑफ दि रूपीज' हा ग्रंथ लिहून सिद्ध केले. समाजशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, धर्मपंडित, घटनाशिल्पकार डॉ. बाबासाहेब हे केवळ अस्पृश्य, दलित बौद्धांचे नव्हे तर संपूर्ण मानवजातीचे नेते आहेत. त्यांनी लिहिलेले संविधान, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्याय ही नितीमूल्य स्वीकारते पंरतु सनातन प्रवृत्तीला लोकशाहीच मान्य नसल्याने ते संविधान बदलण्याची भाषा करतात.

वाढती लोकसंख्या, पाण्याची बचत, पर्यावरण, देशाची अर्थव्यवस्था, सामुदायिक शेती एससी, एसटी, ओबीसी आरक्षण आणि हिंदू कोड बिल यावर विवेचन करून राष्ट्रविकासाला अनुकूल असल्याचे डॉ. बाबासाहेब जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करीत होते. सत्ताधाऱयांनी  त्यावर विचार करून नियोजन केले असते तर लोकसंख्यांचे दुष्परिणाम, पाणीटंचाई, पर्यावरणाचा ढासळणारा समतोल, शेतकऱयांच्या आत्महत्या, महिलांचे 33 टक्के आरक्षण अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागले नसते. परंतु अस्पृश्यांचे नेते म्हणून डॉ. बाबासाहेबांच्या राष्ट्रहिताच्या निर्णयाला नेहमीच विरोध केला. त्याचे भारत आजही परिणाम भोगत आहे. डॉ. बाबासाहेब उच्चजातीत जन्मास आले असते तर याच सवर्णांनी त्यांची सोन्याच्या पालखीतून मिरवणूक काढली असती.

डॉ. बाबासाहेबांनी परिवर्तन क्रांतीच्या चक्राला गतिमान केले हे ते थांबविणे कोणालाच शक्य नाही. त्याचे फलित  म्हणजे शिवराय, संभाजीवरील अन्यायाविरुद्ध मराठा सेवा संघ बोलू लागला. मराठा ओबीसी आरक्षण मागू लागला. स्वराज्यात महिलांना 50 टक्के आरक्षण मिळाले. ही सर्व डॉ. बाबासाहेबांच्या क्रांती संघर्षाची किमया आहे. डॉ. बाबासाहेब म्हणत, माझे नावं घेऊन जयजयकार करण्यापेक्षा माझ्या दृष्टीने जी गोष्ट लाखमोलाची त्यासाठी सारे पाणपणाने झटा. प्रबुद्ध भारताची निर्मिती करणे हेच डॉ. बाबासाहेबांचे ध्येय होते. त्यासाठी आम्ही आपसांतील हेवेदावे, द्वेष, मत्सर सोडून जनहितासाठी बंधुभावातून सामाजिक व राष्ट्रीय एकोपा निर्माण केला पाहिजे.

त्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आघाडी घेऊन संविधान संस्कृती रूजविली आणि फुलविली पाहिजे.जगातील महान नेता डॉ. बाबासाहेबांचे आम्ही वारस आम्हाला ही परिवर्तन चळवळ यशस्वी करावी लागणार आहे. तरच आम्ही भिमाचे अनुयायी ठरु!


आभार
प्रशांत म. गायकवाड

No comments: