Monday 16 May 2011

ब्राह्मण पंडितांचा वेदोक्ताचा वाद

तो 1899 च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचा काळ होता. नेहमीच्या रिवाजानुसार त्या काळात शाहू छत्रपती पंचगंगेवर कार्तिकस्नानासाठी गेले होते. त्यांच्या स‌मवेत बरीच मंडळी होती. त्यात विख्यात ग्रंथकार राजारामशास्त्री भागवत हेही होते. महाराज स्नान करीत होते. नारायणभट नावाचा ब्राह्मण मंत्र म्हणत होता. पण तो वेदोक्त नव्हे, तर पुराणोक्त मंत्र म्हणत असल्याचे राजारामशास्त्री भागवतांच्या बरोबर लक्षात आले. त्यांनी ती गोष्ट महाराजांना सांगितली. महाराजांनी नारायण भटाला त्याबाबत विचारले. तेव्हा तो म्हणाला, शूद्रांना पुराणोक्त मंत्रच सांगायचे असतात. ते म्हणण्यापूर्वी भटजीने स्वतः आंघोळ केली नसली तरी चालते. त्याच्या या जबाबाने महाराज साहजिकच संतापले.

कोल्हापूर छत्रपतींच्या पदरी असलेल्या सोळा शास्त्री घराण्यांपैकी एका घराण्यातील शास्त्री बाळाचार्य खुपरेकर यांनी याबाबतची आपली आठवण सांगितली आहे. त्यानुसार हा नारायण भट बाहेरख्याली होता. "या घटनेच्या आदल्या रात्री त्याचे त्याच्या बायकोशी कडाक्याचे भांडण झाले होते व त्याने तिला मारहाणही केली होती. पहाटे वाड्यावरची गाडी आली, तेव्हा त्या भटजीच्या बायकोने ते घरात नाहीत म्हणून सांगितले. कुठे गेले म्हणून विचारल्यावर, गेले शेण खायला असे उत्तर दिले. गाडीवानाने अर्थ स‌मजून वेश्यावस्तीत जाऊन त्याला शोधून काढले व घरी जाण्यासाठी गाडी वळवली व आंघोळ लवकर उरकायला सांगितले. त्यावेळी आपले बिंग बाहेर पडले व आपली छीथू होणार हे पाहून रागावलेल्या स्थितीत त्याने हे उद्गार काढले. हुज-याने महाराजांना हा प्रकार सांगताच त्यांनी त्याला चाबकाने फोडून काढले. महाराज म्हणाले, आम्ही श्रद्धेने तुम्हाला नमस्कार करतो आणि तुम्ही असले आचरण ठेवूऩ वर गाढवासारखं बडबडता!

No comments: